पुणे : कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून त्याचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची तसेच आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धनकवडी येथील बालाजीनगरमध्ये १८ ऑगस्ट २०२१ ते २८ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला आहे.
अभिमन्यु दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सातारा येथील एका २३ वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अभिमन्यू शेरेकर यांची मैत्री होती. त्यातून त्याने बालाजीनगर येथील घरी फिर्यादीला बोलावले होते. तेथे तिला कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. तिला गुंगी आल्यावर तिच्यावर बलात्कार केला. त्याचे फोटो व व्हिडिओ काढले. हे फोटो व व्हिडिओ फिर्यादीच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर ५ एप्रिल २०२२ रोजी अभिमन्यू त्याचा मित्र प्रशांत कोली व कारचालक यांनी तिला ठाणे येथे नेले. तेथे त्यांनी फिर्यादी यांचे जबरदस्तीने अभिमन्यु याच्याबरोबर लग्न लावून दिले.त्यानंतर फिर्यादी यांनी ते फोटो व व्हिडिओ डिलिट करण्याबाबत विचारणा केली असता अभिमन्युचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडिल दिलीप शेरेकर यांनी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, सबंधित तरुणीने सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ती सहकारनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजगुरु तपास करीत आहेत.