पुणे : वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधून महावितरणमधून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून लाखो रुपये लुटले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री नऊ वाजेपर्यंत बील न भरल्यास वीज कापण्यात येईल, अशी धमकी चोरट्याने महिलेला दिली. महिलेने चोरट्याच्या बतावणीवर विश्वास ठेवला. चोरट्याने महिलेला टिम व्ह्युअर नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने ॲप डाऊनलोड केल्यानंतर तिच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरट्याने लांबविली. या माहितीच्या गैरवापर करुन चोरट्याने महिलेच्या बँक खात्यातून एक लाख रुपयांची रोकड लांबविली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
दरम्यान, बँक खात्याला मोबाइल क्रमांक जोडलेला असल्याने चोरटे या माहितीचा गैरवापर करुन बँक खात्यातून पैसे लांबवितात. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरण आणि पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.