पुणे : औषधांच्या कॅप्सुलमध्ये चक्क पाव किलो सोन्याची भुकटी भरून तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने पुणे विमानतळावरून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉक – पुणे स्पाइसजेटच्या विमानाने ही महिला लोहगावमधील पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर आली. ही महिला खूप घाई गडबडीत निघाली होती. या महिलेवर केंद्रीय सीमाशुल्क विभागाला संशय आला. त्यानंतर तिला अडवून चौकशी केली असता औषधी कॅप्सुल सापडल्या. सोन्याची पेस्ट करून कॅप्सुलमध्ये लपवल्याचे उघड झाले. कॅप्सुलमधून २७२ ग्रॅम सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली.
दरम्यान, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री यांच्या हस्ते नुकतेच पुणे- बँकॉक या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ही विमानसेवा पुणेकरांना थेट आंतरराष्ट्रीय प्रवास करता यावा. यासाठी सुरू केली आहे. मात्र, काही लोकांनी या सेवेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.