पुणे : प्रसिध्दी मिळविण्यासाठी सध्या सोशल मीडियावर रिल्स बनविण्याची सध्या क्रेझ आहे. अशीच एक रिल्स बनवताना एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. भररस्त्यावर रिल्स बनवित असताना मोटारसायकलने शेजारुन जाणार्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.
तस्लिम फिरोज पठाण (वय ३१, रा. गोडगाव, बार्शी, सध्या उरळी देवाची) असे मृत्यु महिलेचे नाव आहे. हा अपघात महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील पालखी रोडवर ६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. याबाबत पोलीस हवालदार जोतीबा शंकर कुरळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयान शहानुर शेख आणि झाइद जावेद शेख (दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान आणि झाइद हे मोटारसायकलवर स्टंट करीत रिल्स बनवित होते. यावेळी तस्लिम पठाण या दुचाकीवरुन घरी जात होत्या. हा शॉटकट असून या रस्त्यावर फारशी रहदारी नसते. आयान शेख हा मोटारसायकल चालवत स्टंट करत होता. झाइद हा व्हिडिओ काढत होता. त्याचवेळी आयान याने तस्लिम पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात पठाण या खाली पडून त्यांचा मृत्यु झाला. हा प्रकार पाहून मदत करण्याऐवजी दोघे पळून गेले. पोलिसांनी केलेल्या तपासात रिल्सच्या नादातून महिलेला जीव गमवावा लागल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.