पुणे : क्रुझर गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ठरलेल्या व्यवहारात ५०० रुपये कमी दिल्याच्या रागातून एका टुरिस्ट व्यावसायिकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे मंगळवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
विनायक उर्फ संतोष बबन गोडसे (वय. ४२, रा. पिंपळवंडी ) असे खुन झालेल्या टुरिस्ट व्यावसायकाचे नाव आहे. तर मयुर अशोक सोमवंशी (रा. राजुरी) असे खुन केलेल्या गॅरेज कामगार आरोपीचे नाव आहे. याप्रकणी सचिन भिमाजी जाधव यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्फ संतोष बबन गोडसे याची क्रुझर गाडी (एमएच १४ डीटी ५३०८) एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई यांच्या गॅरेजवर लावली होती. गाडी दुरुस्ती बिलाच्या ७ हजार ६०० पैकी ७ हजार १०० रुपये रोख दिले होते. गॅरेज कामगार मयुर सोमवंशी याला ५०० रुपये देणे बाकी होते. उर्वरित ५०० रुपयासाठी मयुरने गोडसेकडे सारखा फोनवर करत होता.
त्यांतर मंगळवारी (ता.२४) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांना फोनवरून शिवीगाळ करत गॅरेजवर ये तुला बघून घेतो अशी धमकी दिली. संतोष आळेफाटा चौकातून लगेच गॅरेजकडे गेला. यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. यातून आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांच्या छातीवर हातातील चाकूने वार केले. आणि नंतर स्वतःवरही वार करुन घेतले.
जखमी झालेल्या संतोष गोडसे याला आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयुर सोमवंशी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, टुरिस्ट व्यावसायिक विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याचा खून केल्यानंतर आरोपी गॅरेज कामगार मयूर सोमवंशी याने स्वतःवरही वार करुन घेतले. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये रात्री दाखल केले. त्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.