पुणे : बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत आणि धार्मिक विधी उरकून घरी निघालेल्या पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भिषण अपघातात ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. न्हावरे – तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरची चाकं तुटून बाहेर आली.
राजश्री अण्णा चोपडे (वय ४०), श्रुती दुर्गडे (वय- ३०), शोभा परमेश्वर महानवर (वय – ५५), मिना वाघमोडे (वय – ४५), सावित्री आशिष पाटील (वय-४०), रुपाली अण्णा केसकर (वय – ३०), कविता युवराज बोराटे (वय – ३५), अंजली महारनोर (वय – ७) (रा. सर्वजण, करमाळा, जि. सोलापूर) अशी अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या भाविकांची नावे असून त्यांच्यावर शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा येथील भाविक शिरूर तालुक्यातील करंदी येथे मुक्कामी असलेल्या बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत आणि धार्मिक विधी करण्यासाठी आले होते. धार्मिक विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर परतीच्या मार्गावर पिकअप गाडीतून करमाळ्याकडे निघाले होते.
न्हावरे – तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहीवडी घाटात तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारे तसेच भाविक बसलेले पिकअप आणि न्हावरेच्या दिशेकडून येणारा ट्रँक्टर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रँक्टर चालकाने चुकीच्या दिशेने आपले वाहन आणल्याने हा अपघात झाला.
दरम्यान, या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली आहेत. तसेच ट्रँक्टरच्या इतर भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्रँक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. ही धडक एवढी भयानक होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.