बीड : व्हॉट्सअॅपला ‘आय एम सॉरी’ असे स्टेटस ठेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या घाटनांदुर गावात घडली आहे. आत्महत्या करणारा तरुण घाटनांदुर गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य असून एका खासगी संस्थेत शिक्षक देखील होता.
नितेश कोकणे असे आत्महत्या केलेल्या तरुण शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश कोकणे हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले होते. ते खासगी संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. कोकणे यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
कोकणे यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेचा तापस पोलीस करीत आहे.