पुणे : एन.डी.पी.एस. गुन्ह्यात अडीच वर्षे फरार असलेल्या टाझानियाच्या तस्कराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून २३ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जेम्स डार्लिंगटन लायमो (वय. २९ रा. जाधवनगर, हांडेवाडी मुळ रा. टांझानिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एन.डी.पी.एस गुन्ह्यात मागील अडीच वर्षापासून फरार असणारा आरोपी जेम्स लायमो हा जाधवनगर येथे राहत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला समजली. आरोपी हा दिल्लीत राहत होता तो मागील काही महिन्यापासून जाधववाडी येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला.
दरम्यान त्याच्या घराची झडती घेत २३ लाख २६ हजार रुपयांचे ११६ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम कोकेन, १० हजार रुपयांचे तीन मोबाईल, २०० रुपयांच्या छोट्या डब्या, ५० हजार रुपये किंमतीची पल्सर दुचाकी, रोख ६ हजार असा एकूण २३ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घोरपडे, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, विशाल शिंदे, संदेश काकडे, सचिन माळवे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.