पुणे : मावशीच्या गावाहून आईसोबत घरी परत येत असताना धावत्या रेल्वेतून पाय घसरुन पडल्यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना जळगाव जिल्ह्यात रविवारी (ता.१२) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
प्रणव विजय बारी (वय. २० वर्ष, रा. गांधी चौक, पिंप्राळा, जळगाव) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये प्रणव शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकाच्या लग्नासाठी तो जळगावला आला होता. शुक्रवारी (ता. १०) प्रणव व त्याची आई ज्योती बारी असे दोघेही भुसावळ येथे मावशीला भेटण्यासाठी गेले होते.
मावशी व आपल्या मावस भावाला भेटून प्रणव हा आईसोबत जळगाव येथे येणासाठी भुसावळ मेमू रेल्वेत बसला होता. आई ज्या सीटवर बसली होती, त्या सीटसमोरच असलेल्या दरवाजात प्रवण हा उभा होता.
मेमूने भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर प्रणवचा तोल गेला आणि तो धावत्या रेल्वेतून आईच्या डोळ्यादेखत खाली पडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्योती बारी यांनी आरडाओरड केली. यानंतर प्रवाशांनी रेल्वेची चैन ओढून रेल्वे थांबवली, त्यानंतर ज्योती बारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथे राहणाऱ्या ज्योती यांच्या बहिणीचा मुलगा राकेश हा देखील घटनास्थळी दाखल झाला. यानंतर प्रणवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकुल वातावरणात प्रणव याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.