पुणे : सिंहगडावरील देवटाक्यात सहलीसाठी आलेला बारावीचा विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १८) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
शाहिद मुल्ला असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकत होता. स्थानिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत संबंधित विद्यार्थ्याला पाण्यातून बाहेर काढले असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलचे इयत्ता बारावीचे साठ विद्यार्थी व चार शिक्षक सिंहगडावर सहलीसाठी आले होते. देवटाके परिसरात असताना शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरला व तो थेट पाण्यामध्ये पडला. स्थानिकांनी ताबडतोब पाण्यामध्ये उड्या घेऊन शाहिद चा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून येत नव्हता.
प्रयत्नांची पराकाष्टा करत स्थानिकांनी शाहिद मुल्ला यास पाण्यातून बाहेर काढले आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने देवटाके पूर्ण भरलेले आहे. त्यामुळे शाहिदचा शोध लागण्यास उशीर झाल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे
दरम्यान, विद्यार्थ्यांसोबत आलेले शिक्षक व विद्यार्थी या दुर्दैवी प्रकारामुळे घाबरलेले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती देण्यात आली होती परंतु अग्निशमन दलाचे जवान येण्या अगोदरच स्थानिकांनी बुडालेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढले आहे.