पुणे : एका सहा वर्षीय मुलाचे अक्षर सुंदर नसल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने त्याला मारहाण केली. तसेच मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर आणखी मारेल, अशी धमकी दिल्याचा प्रकार लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयातून उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचा सहा वर्षीय मुलगा लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयात शिकत आहे. फिर्यादी यांच्या मुलाचे अक्षर छान नसल्यामुळे संबंधित शिक्षिकेने त्याला हाताने मारहाण केली. तसेच यानंतर जर मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर तुला आणखी मारेल, अशी धमकी या शिक्षिकेने दिली.
दरम्यान, मुलाने घरी जाऊन आपल्या आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलाच्या वडिलाने याप्रकणी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.