हडपसर : क्रेडिट कार्डचे थकित बिल वसुलीसाठी गेलेल्या रत्नाकर बँक लिमिटेडच्या गुंडांनी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरातील काळेपडळ येथे मंगळवारी (ता.६) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. सदर घटनेची व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
अर्जुन लक्ष्मण राऊत, निखिल ज्ञानेश्वर ताम्हाणे, परम नामदेव पाटील आणि ऋषिकेश हनुमंत पांदिवाले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या आईच्या नावावर रत्नाकर बँक लिमिटेडचे क्रेडिट कार्ड आहे. थकीत कर्ज वसुली करण्यासाठी चार जन तक्रारदार महिलेच्या घरी आले होते. तेव्हा चार जणांनी तक्रारदार यांच्या वडिलांना हाताने मारहाण केली. त्यानंतर एकाने त्यांच्या अंगाशी झोंबा झोंबी करुन विनयभंग केला. तसेच त्यांना शिवीगाळ करुन लज्जास्पद वर्तन केले.
दरम्यान, याप्रकरणी तक्रारदार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी वरील चार आरोपींना अटक केली आहे. तरी, पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर करीत आहेत.