अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील तळेगाव न्हावरा रस्त्यावरील म्हाळुंगी फाट्यावर शुक्रवारी (दि.७) रात्री आठच्या सुमारास सुखदेव सोपान मस्के हे घोलप पाटील वाडी बाजूकडून डेअरीवर दूध घालून घरी परतत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. यामध्ये मस्के यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
शुक्रवारी (दि.७) रात्री आठच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक सुखदेव सोपान मस्के हे घोलप वाडीमध्ये डेअरीवर दूध घालून घरी येत असताना श्रावणी हॉटेलच्या समोर न्हावरे बाजूने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात पिकअपने मस्के यांना जोरदार धडक दिली. यामध्ये पिकअप चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पिकअपसह पळ काढला.
नागरिकांच्या मदतीने सुखदेव मस्के यांना शिक्रापूरमध्ये माऊली नाथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, देविदास बाळासो करपे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार हे करत आहेत.
‘पोर्शे अपघाता’ची पुनरावृत्ती
शिरुर तालुक्यातही ‘पोर्शे अपघाता’ची पुनरावृत्ती झाली असून, पोलिस पाटलाच्या एका अल्पवयीन मुलीने 31 मे 2024 रोजी मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. शिरूर तालुक्यात नऊ दिवसाच्या आत ‘हिट अँड रन’ची ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमधून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.