पुणे : एका हवालदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याकडेच खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातून उघडकीस आली असून याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपी हवालदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
स्वप्नील विश्वास कोळी (वय. ३९ रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कोळी हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. पिडीत मुलगी राहत असलेल्या कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात तो गेला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केले. शिवाय ती रेड लाईट एरियात राहत असल्याने येथे राहायचे असेल, तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत त्याने तिच्याकडे खंडणीची मागणी केली.
दरम्यान या घटनेची माहिती होताच सामाजिक संस्थेने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी ही केली असता यामध्ये हवालदार कोळी दोषी आढळला. त्यानंतर मंगळवारी (ता. ३१) मध्यरात्री त्याच्यावर ते कार्यरत असलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.