पुणे : दौंड राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलिसांच्या गणवेशाच्या पुरवठ्यात पोलीस खात्यालाच चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शिवरामपंत पालव (रा.मुंबईतील भोईवाडा, परेल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच नंबर युनिटचे दौंडचे पोलीस निरीक्षक सुरेश दगडू जाधव यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, 14 मार्च 2017 ते 14 डिसेंबर 2022 या दरम्यान एसआरपीच्या दौंड येथील सन्मान गार्डसाठी आवश्यक गणवेश आणि त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची परवानगी शासनाने दिली. त्यांतर राज्य राखीव पोलिस दलाने पुरवठादारांकडून दरपत्रके मागवली. या दरपत्रकात प्रो प्रा. पालव अॅण्ड ब्रदर्स या पुरवठादारास त्याचे दर कमीत कमी असल्याने साहित्य आणि गणवेश पुरवठा करण्याचे टेंडर बहाल करण्यात आले.
तसेच, त्याच्या बिलाची रक्कम राज्य राखीव पोलीस दलाच्या पाचव्या युनिटच्या स्टेट बॅंकेतील खात्यातून धनादेशाद्वारे देण्यात आली होती. मात्र या व्यवहारात जास्त रक्कम पुरवठादाराकडे जमा झाली. त्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाच्या मुख्यालयाने ही जास्तीची रक्कम पोलीस दलाच्या दौंड येथील स्टेट बॅंकेच्या शाखेतील खात्यावर जमा करण्यासाठी पालव यांना सूचना देण्यात आली.
व्यापाऱ्याने एक धनादेश जमा केला. मात्र तो वठला नाही, त्यासंदर्भात या व्यापाऱ्यास कळवल्यानंतर त्याने काही रक्कम स्टेट बॅंकेत आरटीजीएस केली. मात्र उरलेली रक्कम देण्यास तो टाळाटाळ करु लागला. नोटीस देऊनही त्याने ही रक्कम जमा केली नाही. पोलिसांनी त्याला अनेकदा सूचना देखील केल्या. मात्र पालव ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अनेकदा पैसे मागितले मात्र पालव यांनी पैसे पाठवले नाहीत. त्यामुळे पोलिसांनीच तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पोलिसांनी दौंड पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पालव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस सखोल करीत आहे.