लोणी काळभोर, (पुणे) : पार्टीला आमंत्रण दिले नसल्याच्या कारणावरून सोरतापवाडी (ता. हवेली) येथील एका तरुणावर चौघांनी मारहाण करीत कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (ता. १३) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल आरणे, अक्षय, आरणे, तेजस चौधरी, अजय गाढवे, रा. सर्वजण महादेवनगर, सोरतापवाडी (ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. जिवन किसन शिंदे (वय-२१, रा. महादेवनगर, सोरतापवाडी (ता. हवेली) अशी मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जिवन शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात वरील चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवन शिंदे हे त्याच्या कुटुंबीयासोबत सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत राहतात. शिंदे यांनी २०१८ साली आरंभ ढोल ताशा पथक सुरु केले होते. या पथकाचे शिंदे अध्यक्ष होते. तर राहुल आरणे हा सभासद होता. राहुल हा कधी-कधी पथकात येत होता व बाकीच्या काही मुलांना घेऊन जात होता. त्यामुळे सरावामध्ये खंड पडत असल्याने फिर्यादीने आरणे याला तुला यायचे असेल तर वेळेला येत जा व वाजवणाऱ्या मुलांना घेऊन जात जाऊ नको नाहीतर पथकामध्ये येत जाऊ नको. असे म्हणल्यामुळे राहुलला त्याचा राग आला व शिवीगाळ करून त्या ठिकाणावरून निघून गेला होता.
मंगळवारी (ता. १३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पथकाच्या सर्व सभासदांना बुधवारी जेवणाच्या पार्टीचे नियोजन ठरले होते. त्या पार्टीला राहुलला आमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे त्याने संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिंदे याच्या घराबाहेर राहुल आरणे, अक्षय आरणे, तेजस चौधरी, अजय गाढवे, यांनी घराबाहेर बोलावून ‘तुला लय माज आलाय का? मला सोडून पार्टी करताय का ती कशी करताय ते बघून घेतो असे म्हणून पाठीमागे लपवलेला कोयता काढून शिंदे यांच्यावर उगारला. त्यावेळी उजवा हात मध्ये घातला त्यामुळे गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, पाठीमागून तेजस चौधरी याने डोक्यात कोयत्याने वार केला. यामध्ये शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या मारहाणीत भाऊ पवन शिंदे व वडील किसन उत्तम शिंदे घरातून पळत येऊन का मारहाण करता असे विचारले असता तुम्ही मध्ये पडला तर तुमचाही जीव घेईन असे म्हणून त्या ठिकाणावरून मारहाण करून निघून गेले. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील चौघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.