शिरुर: कार्तिकी वारीनिमित्त आळंदी येथे पायी निघालेल्या दिंडी सोहळ्यातील भाविकाला नगरवरुन पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हलची खंडाळा माथा येथे पाठीमागून धडक बसल्याने शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील गुलाब मोहदीन शेख (वय 59) या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला एक वारकरी किरकोळ झखमी झाला आहे. याबाबत प्रकाश संजय शिंदे रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. 17) रोजी सकाळी 8 च्या सुमारास गोलेगाव (ता. शिरुर) येथील ओम चैतन्य कानिफनाथ महाराज पालखी सोहळा ही दिंडी नगर पुणे रस्त्याने आळंदी कडे जात असताना खंडाळा माथा येथे घाट उताराला नगर वरुन पुण्याकडे जात असलेल्या लक्झरी बस क्र. एम पी 41 पी 6663 ने गुलाब मोहदीन शेख यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्या सोबत असलेले बबन महादेव वाखारे (वय 65), रा.गोलेगाव, (ता. शिरुर) जि. पुणे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत बस चालक शिवकुमार विश्वास (वय 43) रा. बंगाली कॉलनी, रामकृष्ण नगर, होशंगाबाद, मध्यप्रदेश याच्यावर रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विजय सरजिने करत आहेत.
अन्यथा घडला असता मोठा अनर्थ…
शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील पायी दिंडी सोहळा आज सकाळी 8 वाजता खंडाळा माथा येथे आला असताना सगळे वारकरी पालखीच्या रथाच्या पाठीमागे चालत होते. परंतु काही कारणास्तव गुलाब शेख यांनी सर्व वारकऱ्यांना पालखी रथाच्या पुढे चालण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच हि दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे जर वारकरी रथाच्या पाठीमागे चालत असते. तर मोठा अनर्थ घडला असता असे या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांनी सांगितले. गुलाब शेख यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे गोलेगाव ग्रामस्थांसह सर्व वारकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.