पुणे : जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग करून याबाबत पोलिसांना सांगितले तर, भावांना मारुन टाकण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (ता.२५) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास दापोडी गावठाण येथे घडली आहे.याप्रकणी भोसरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश शिंदे (रा. दापोडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकणी पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी मुलगी घरात एकटी असताना आरोपी गणेश शिंदे हा घरी आला व त्याने मुलीसोबत गैरवर्तन केले. तसेच याबद्दल कोणाला सांगितले किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर दोन्ही भावांना मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली.
पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी गणेश शिंदे याच्या विरुद्ध 354 (अ), 452, 506, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.