लहू चव्हाण
पाचगणी : मुलीला व पतीला जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी एकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
श्याम सुभाष मालुसरे (रा. खिंगर, ता. महाबळेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी मालुसरे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षाच्या कालावधीत २५ वर्षीय महिलेला खिंगर ग्रामपंचायत हद्दीत श्याम मालुसरे याने त्याच्या राहत्या घरी तू तुझ्या नवऱ्याविरुद्ध खोटी केस केली आहेस. तुला मी जेलमध्ये पाठवू शकतो तुझ्या मुलीला जिवंत सोडणार नाही तुझे पती यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत फिर्यादीच्या मनाविरुद्ध वारंवार शरीर संबंध ठेवले. तसेच फिर्यादी यांचे शरीराशी अश्लील चाळे करून अंगावरून हात फिरवून त्यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, २५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद माने करीत आहेत.