लोणी काळभोर : फुरसुंगी (ता. हवेली) येथील एका कंपनीतील विधवा महिलेला मिठी मारून लगट करणाऱ्या लोणी काळभोर येथील एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष चंद्रकांत काळभोर (वय-३७, रा. लोणी काळभोर, ता. हवेली ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकणी एका ३२ वर्षीय पिडीत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा फुरसुंगी परिसरात २०१८ ते २८ डिसेंबर २०२२ या दरम्यान घडला आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष काळभोर व पिडीत महिला हे दोघे एकमेकांचे ओळखीचे होते. फिर्यादी महिला या पतीच्या निधनानंतर कंपनीत कामाला लागल्या आहेत. त्यानंतर आरोपी संतोष काळभोर यांनी फिर्यादी महिलेला ‘तू माझ्यासोबत प्रेम करणार नसशील, तर मी तुझ्या घरी येऊन नातेवाईकांना सांगेन व तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली.
दरम्यान, आरोपी संतोष काळभोर याने फिर्यादीला जबरदस्तीने मिठी मारून लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच महिन्यातून ३ वेळा भेटण्याची अट घातली. अन्यथा तुझ्या मुलाला मारून टाकीन आणि तुझ्या नातेवाईकांसमोर तुझी बदनामी करेन आणि तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी दिली.
याप्रकरणी पिडीत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष काळभोर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, हडपसर पोलिसांनी आरोपी संतोष काळभोर याला अटक केली आहे.
पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे करीत आहेत.