पुणे : पिंपरी चिंचवडमधील एका वेबपोर्टलच्या पत्रकाराला त्यांच्या मैत्रिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना भोसरी येथे घडली.
दोन दिवसांपूर्वी भोसरी पोलीस ठाण्यात त्याची मैत्रिण बेपत्ता झाल्याची तक्रार या पत्रकाराने दिली होती. मात्र, आज त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपीने तिच्यापासून सुटका करण्यासाठी तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिची विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे. हा प्रकार 3 ऑगस्ट 2022 रोजी घडला असून याप्रकरणी शनिवारी (दि.5) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
आरोपी व चंद्रमा यांची दोन वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोघेही भोसरीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. रामदास पोपट तांबे (वय ३०, रा. गुरुकृपा कॉलनी, दिघी रोड, भोसरी, मूळ- नगर) असे अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. चंद्रमा सीमांचल मुनी (वय २८, रा. रावला पोली, ओरिसा ) असे अपहरण झालेल्या तरुणीचे नाव आहे.
चंद्रमा ही तिच्या वडिलांशी त्यांच्या दोन घरांपैकी एक घर आपल्या नावावर करून देण्यासाठी वाद घालत होती. परंतु आरोपीला ही बाब पटत नसल्याने त्यांच्यात वाद वाढू लागले. आरोपीने साथ दिली नाही तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची वारंवार ती धमकी देऊ लागली.
यातून कायमची सुटका करण्याचे आरोपीने ठरवले. भोसरीतील राहत्या घरातून ३ आॅगस्टला तिचे अपहरण केले. त्यानंतर खेड तालुक्यातील केळगाव येथील नदीपात्रात तिची विल्हेवाट लावली. भोसरी पोलिस चंद्रमा हिचा अद्याप शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, ९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.भोसरी पोलीस तपास करीत आहेत.