पुणे : पुणे-सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील एका मसाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याचा पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाच्या पोलीसांनी पर्दापाश केला आहे. पोलिसांनी मसाज सेंटरवर काल शुक्रवारी (ता.२) दुपारी तीन वाजण्याच्या छापा टाकून एक परदेशी व दोन स्थानिक तरुणींची सुटका केली आहे. तर मसाज सेंटरचा मालक व व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे (वय ३१ रा.वडगाव ता.हवेली जि.पुणे) व्यवस्थापक योगेश पवार (रा.नांदेड गाव ता.हवेली जि.पुणे) अथर्व प्रशांत उभे (वय १९ रा.धायरी, बेनकरवस्ती ता.हवेली जि.पुणे) आणि महिला व्यवस्थापक ज्योती विपुल वाळींबे (वय ३० रा.न-हे, ता.हवेली) असे हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता.२) पथक गस्त घालत असताना, पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले यांना नांदेड सिटी येथील डेस्टीनेशन सेंटर मॉलचे पहिला मजल्यावरील शॉप नं. एफ-६४ या ठिकाणी ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली परदेशी तरुणीकडून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीचा खातीरजमा करण्यासाठी पथकाने मसाज सेंटरवरील छापा मारण्यासाठी सापळा रचला. आणि पथकाने बनावट ग्राहक तयार करून त्या ठिकाणी पाठविले. त्या ठिकाणी मसाजच्या नावाखाली एक्स्ट्रा सर्व्हीसचे नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, एक परदेशी व दोन स्थानिक पिडीत तरुणी मिळून आल्या. मसाज सेंटर येथे मिळून आलेल्या पिडीत ३ तरुणींना महिला सुधार गृहात पाठविण्यात आलेले आहे.
दरम्यान, पोलिसांनी मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे, व्यवस्थापक अथर्व प्रशांत उभे व ज्योती विपुल वाळींबे यांना सदर गुन्हयामध्ये अटक केली आहे. तर मुख्य आरोपी योगेश पवार याचा शोध चालू आहे. तिन्ही अटक आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये रिमांड घेणेकामी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, सहाय्यक फौजदार महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सिमा जगताप यांच्या पथकाने केली आहे.