पुणे : भांडणे करणार्या टोळक्याला घरासमोर भांडणे करु नका, असे म्हटल्याच्या रागातून गुंडांच्या टोळक्याने तरुणाला कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच तरुणाच्या आजीच्या गळ्याला कोयता लावून घरावर दगडफेक देखील टोळक्यानी केली आहे.
ही घटना वलवा वस्तीत मंगळवारी (ता. ६) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकणी तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अनिकेत दिलीप मोडक (वय १९, रा. वडकी, हवेली) असे फिर्याद दिलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यानुसार रोहन इंगळे, शुभम पवार, अविनाश नाईकनवरे, ऋतिक कवठेकर (सर्व रा. वडकी), नन्या हरगुडे, आकाश हरगुडे, अनिकेत पालकर व विघ्नेश यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांच्या घरासमोर काही जण भांडण करीत होते. अनिकेत याने ऋतिक कवठेकर याला त्यांच्या घरासमोर भांडणे करु नका, असे सांगितले. त्यावरून आरोपी राग आल्याने त्याने फिर्यादी अनिकेत याला फोन शिवीगाळ करून रागवले. त्यानंतर मंगळवारी (ता. ६) मध्यरात्री घरासमोर येऊन घरावर दगडफेक केली.
दरम्यान, आरोपीने अनिकेत याला तुला मी जिवंत सोडत नाही असे म्हणून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. तेव्हा त्याची आजी मध्ये आली असताना आकाश याने त्यांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली. इतर आरोपींनी हातातील दगडे त्यांच्या घरावर फेकली.
तसेच दरवाजावर, खिडकीवर, रिक्षा व बुलेटवर दगड मारुन त्यांचे नुकसान करून निघून गेले. याप्रकणी अनिकेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.