सांगली : शिक्षकाची रजा मंजूर करण्यासाठी 15 हजारांची लाच घेणाऱ्या गट शिक्षण अधिकार्यांसह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रतिलाल मन्याप्पा साळुंखे आणि उपशिक्षक कांताप्पा दुंडाप्पा संन्नोळी अशी लाचखोरांची नावे आहेत.
तीन महिन्यांची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी प्रत्येक महिन्याचे 20 हजार असे एकूण 60 हजारांच्या लाचेची मागणी करून 15 हजार रुपये लाच घेताना सांगली जिल्ह्यातील जत येथील पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकार्याला रंगेहात पकडण्यात आले. कन्नड शाळेत लाच लुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. रतिलाल मन्याप्पा साळुंखे आणि उपशिक्षक कांताप्पा दुंडाप्पा संन्नोळी अशी लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदार यांनी अर्जीत रजा मंजूर करण्यासाठीचा अर्ज गट शिक्षण अधिकारी जत यांना सादर केला होता. ही रजा मंजूर करून देण्यासाठी पंचायत समिती जत येथील गट शिक्षण अधिकारी रतिलाल साळुंखे यांनी आणि मुचंडी येथील सिध्दीहळ वस्ती वरील जिल्हा परिषद कन्नड शाळा येथील उप शिक्षक संन्नोळी यांनी तीन महिन्याच्या रजेसाठी प्रत्येक महिन्याचे 20 हजार असे एकूण 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली होती. तक्रारीनुसार पडताळणी केली असता उपशिक्षक सन्नोळी यांनी 60 हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. एका महिन्याचे 15 हजार सन्नोळी यांचेकडे देण्याबाबत सांगितले. त्यानंतर मुचंडी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा येथे लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला असता सन्नोळी याने 15 हजार घेताना रंगेहात पकडण्यात आले.