पिंपरी : आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिरात सापडलेला दीड लाखाचा सोन्याचा दागिना निगडी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. निगडी पोलिसांनी दोघांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार केला आहे.त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो.
रामया दुंडया हिरेमठ व प्रमोद परभाकर कापसे असे दागिना पोलिसांकडे सुपूर्त केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यात महिलांची संख्या जास्त असते. या मंदिरात २६ ग्रॅम सोन्याचा दागिना रामया दुंडया हिरेमठ व प्रमोद परभाकर कापसे यांना सापडला. हा दागिना भाविकाचा असावा, असे म्हणून त्यांनी तो पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे ठरविले.
त्यानंतर दोघांनी निगडी पोलीस ठाणे गाठले. आणि निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित सुळे यांच्याकडे दागिना सुपूर्द केला. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण, सपना सकुंडे, वर्षा खैरे, सी. वाघमारे उपस्थित होते.
दरम्यान, खासगी कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामया हिरेमठ हे महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या पिंपरी विधानसभा विभागाचे सचिव आहेत. दोघांनी पोलिसांकडे दागिना सुपूर्द केल्यामुळे दोघांचेपण सर्वत्र कौतुक होत आहे.