पुणे : एका अल्पवयीन मुलाने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अल्पवयीन मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का? असे स्टेटस ठेऊन प्रपोज केल्याची घटना उघडकीस आलीय. हडपसर पोलीस स्थानकात याप्रकरणी मुलीच्या आईने प्रपोज करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी विद्यार्थ्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अल्पवयीन मुलगा आणि मुलगी हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेतात. दोघेही हडपसर परिसरात राहतात. अनेकदा हा मुलगा मुलीचा पाठलाग करत होता. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा तुला उचलून घेऊन जाईल, अशी धमकी देखील तो वारंवार मुलीला देत होता. मात्र, मुलीने याकडे दुर्लक्ष केले. मुलगी दुर्लक्ष करते हे पाहून आरोपी मुलाने तिचा फोटो काढून माझी बायको होशील का? असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले .
दरम्यान, मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.