पुणे : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीला गुंगीचे ओैषध देऊन अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना सदाशिव पेठेतून समोर आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तरुणीला कल्याण येथे डांबून ठेवण्यात आले होते. तरुणीने स्वत:ची सुटका केली आणि तिने कल्याण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर याप्रकरणाची तपासणी पुण्यातील खडक पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी मूळची साताऱ्याची आहे. ती पुण्यात सनदी लेखापाल परीक्षेची तयारी करत होती. सध्या ती शुक्रवार पेठेतील एका वाड्यात पेईंग गेस्ट म्हणून राहायला आहे. मंगळवार (ता.१) ला तरुणी सदाशिव पेठेतून निघाली होती. त्यावेळी दोन महिला तिला भेटल्या त्या महिलांनी त्यांचा चेहरा कापड्याने झाकून घेतला होता. त्या महिलांनी तरुणीकडे पत्ता विचारण्यााचा बहाणा केला. तिला एक कागद वाचण्यास दिला. त्यानंतर तरुणीला गुंगी आली.
त्यानंतर, तरुणीला चक्कर आल्याचे सांगून तिला रिक्षात बसवून तिला रुग्णालयात नेत असल्याची बतावणी नागरिकांकडे केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेतील तरुणीला कल्याण येथे नेले. कल्याण येथील एका अंधाऱ्या खोलीत तरुणीला जाग आली.
तिचा मोबाइल संच, आधारकार्ड, रोकड चोरुन नेण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे तिने पाहिले. त्यानंतर तरुणी खोलीतून बाहेर पडली. तिने विचारणा केली. तेव्हा ती कल्याणमध्ये असल्याचे तिला समजले.
दरम्यान, कल्याण येथील वाहतूक पोलिसांची मदत घेऊन तिने कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. तिचे कुटुंबीय कल्याणमध्ये पोहोचले. त्यानंतर या घटनेची माहिती कल्याण पोलिसांना देण्यात आली. कल्याणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.