पुणे : शाळेच्या आवारात मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकावर टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना लोहगाव परिसरात शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे.
या हल्ल्यात उमेश खांदवे (वय ४०, रा. लोहगाव) हे गंभीर जखमी झाले आहे. खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदवे यांची मुलगी लोहगाव येथील एका शाळेत शिकत आहे. शाळेच्या प्रवेशद्वारासमोर टोळक्याकडून छेडछाडीचे प्रकार सुरू असल्याने काही दिवसांपूर्वी खांदवे यांनी त्यांना जाब विचारला होता. त्यांना शाळेच्या परिसरातून हाकलून दिले होते.
शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते मुलीला घरी नेण्यासाठी आले होते. त्या वेळी प्रवेशद्वाराच्या परिसरात टोळके थांबले होते.
त्यानंतर टोळक्याने खांदवे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात गज मारला. तसेच कोयत्याने वार केला. कोणी मध्ये आल्यास जीवे मारू, अशी धमकी टोळक्याने दिली. कोयता उगारुन टोळक्याने दहशत माजविली.
दरम्यान, खांदवे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात थांबलेले पालक भयभीत झाले. याप्रकरणी उमेश खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहाने करीत आहेत.