शुभम वाकचौरे
जांबूत : जुन्नर तालुक्यातील आळे येथील बाबळबन परिसरामध्ये सोमवारी (ता.९) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. या मुलाचा दवाखान्यात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शिवांश अमोल भुजबळ असे या मुलाचे नाव आहे. सोमवारी चार वाजण्याच्या सुमारास शिवांश हा घरासमोरच्या ओट्यावर खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने त्याला उसात फरफटत नेले. त्यामध्ये शिवांश गंभीर जखमी झाला. तेथे जवळच असलेला अविनाश बबन गडगे यांनी हा प्रकार पाहिल्याने त्यांनी आरडाओरडा केला. आणि शिवांश याची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.
आळेफाटा या ठिकाणी शिवांशला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व डॉक्टरांच्या पथकाने शिवांशला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे आळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेची माहीती मिळताच आमदार अतुल बेनके व उप वनसंरक्षक अमित भिसे व वैभव काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. उप वनसंरक्षक अमित भिसे यांनी घटनास्थळी पिंजरा लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.