लोणी काळभोर, (पुणे) : मागील काही दिवसांपासून श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही पोलिसांची आंधळी कोशिंबिर सुरू आहे. याचाच फायदा घेत थेऊर परिसरात अवैध धंद्यासह भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे थेऊरसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.
छोटी-मोठी दुकाने फोडण्याच्या घटना घडत आहेत. मात्र पोलीस कर्मचारी व अधिकारी मनाला वाटले तर घटनास्थळी भेट देवुन पहाणी करतात व वाटले तर नाही. थेऊर परिसरात मागील दोन महिन्याच्या कालावधीत ७ छोटी-मोठी दुकाने फोडली आहेत. मात्र यासंदर्भात पोलिसांनी आजपर्यत कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. तसेच एक दुचाकी चोरीला गेली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह व्यापारी वर्गातुन लोणी काळभोर पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत आहे.
मात्र पोलीस दूरक्षेत्र थेऊर या ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी सदर घटनेकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप संबंधित दुकानदारांनी केला आहे. मागील दोन महिन्यांपासुन भुरट्या चोरट्यांनी या भागाला लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात दुकाणात रोख रक्कम, साहित्य, व दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. त्यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सदर परिसरात गस्त वाढवण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
दरम्यान, थेऊर परिसरात रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भल्या सकाळी दुकानदारांनी पोलिस ठाणे गाठले होते. यात काही आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहेत. मात्र पोलीस सीसीटीव्ही पहायलाहि तयार नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तर मात्र संबंधित आरोपी व पोलिसांचे संगणमत आहे का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अशा घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होवून अशा प्रवृत्ती विरूद्ध उपाय योजना व्हावी अशी जनसामान्यांमधून मागणी होत आहे.