सोलापूर : घरात पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली असताना अचानक ठिणगी उडाल्यामुळे झोपडीला भीषण आग लागली. या आगीत वृद्ध पती-पत्नीचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे.
ही घटना बार्शी तालुक्यातील गाडेगाव परिसरात सोमवारी (ता. १३) पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
भीमराव काशीराम पवार (वय.९५ वर्ष) आणि कमलबाई भीमराव पवार (वय. ९० वर्ष) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, गाडेगाव परिसरात राहणाऱ्या कमलबाई ह्या नेहमीप्रमाणे सकाळीच उठल्या नंतर, त्यांनी घरातील चुल पेटवली आणि अंघोळीसाठी गरम पाणी ठेवले.
यानंतर त्या घराबाहेर बांधलेल्या म्हशीचा चारा पाणी करण्यासाठी गेल्या. त्यानंतर ते म्हैस बांधत असताना घरातील चुलीची ठिणगी उडाल्याने झोपडीला भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले.
दरम्यान, कमलाबाई यांचे पती घरात झोपले असल्याने भर आगीतच कमलबाई आपल्या पतीला उठवण्यासाठी गेल्या. मात्र, अचानक आगीने उग्ररूप धारण केले.
त्यामुळे दोघांनाही घराबाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. अखेर कमलाबाई यांच्यासह त्यांचे पती भीमराव पवार यांच्यासह आगीत होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.