शिरूर : पुणे-नगर महामार्गावर कार पंक्चर झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या चालकासह कुटुंबास कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी ३ लाख लुटल्याची धक्कादायक घटना न्हावरा फाट्याच्या पुढे शिरूरजवळ घडली आहे.
याप्रकरणी धन्यकुमार मदनलाल बरमेचा (वय ५२, रा. केडगाव, ता. जि. अहमदनगर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धन्यकुमार बरमेचा हे कुटुंबासह मुंबई येथे गेले होते. तेथून काम आटोपून मंगळवारी (ता.३) गावी माघारी चालले होते. पुणे-नगर रस्त्यावर जात असताना, न्हावरा फाट्याच्या पुढे शिरूरजवळ नमो फर्निचर येथे त्यांची गाडी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंक्चर झाली.
दरम्यान, रस्त्याच्या एका बाजूला घेऊन स्टेपणी बदलण्यासाठी थांबले असता दुचाकीवर आलेल्या २५ ते ३० वर्षे वयोगटाच्या कोयता गँगच्या तीन चोरटे तेथे आले. आणि म्हणाले ‘येथे का थांबला?’ अशी विचारणा करीत कोयत्याचा धाक दाखवून बरोबर असलेल्या महिलांसह अंगावरील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, मंगळसूत्राचे पॅडल, डायमंड असलेल्या दोन न्याच्या अंगठ्या, सोन्याच्या दोन चेन, डायमंडची अंगठी, रोख दहा हजार रुपये असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देम्माल चोरून नेला.
याप्रकरणी धन्यकुमार बरमेचा यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ करत आहेत.