यवत : पिंपळगाव (ता. दौंड) येथील एका कुटुंबाला १० जणांनी लोखंडी गज, काठ्या, व हाताने मारहाण करून ४ जणांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी (ता. २७) घडली आहे.
दत्तात्रय मारुती शेलार, लता शंकर शेलार, मनीषा ईश्वर शेलार, कल्पना दत्तात्रय शेलार, कमलाबाई ढमढेरे, सुमन मारुती शेलार, चेतन शंकर शेलार, वैभव शंकर शेलार, मयूर ईश्वर शेलार,विक्रांत दत्तात्रय शेलार, (रा. सर्वजण, पिंपळगाव, ता. दौंड) अशी मारहाण करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत. तर रोहिणी संतोष जवळे, संतोष चंद्रकांत जावळे, भाऊ श्रीकांत, संजय चंद्रकांत जावळे, अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी रोहिणी संतोष जावळे (वय- ३८ ) यांनी १० जणांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी जावळे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीत राहतात. बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण झोपले होते. तर त्यांचा मुलगा जिमला गेल्यामुळे घराचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत होता. यावेळी वरील १० जन हातामध्ये लोखंडी गज, काठ्या, घेऊन आले होते.
यावेळी त्यांनी घरामध्ये प्रवेश केला व रोहिणी जावळे यांना मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी जावळे मोठ्याने ओरडल्याने भाऊ श्रीकांत याने बाहेर येऊन पाहणी केली असता त्यालाही मारहाण केली. यावेळी दीर संजय जावळे, पती संतोष जावळे यांना लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी वरील १० जणांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. जखमींवर यवत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असुन पुढील तपास यवत पोलिस करत आहे.