शिरूर : पुणे-नगर महामार्गावर एका मद्यधुंद कारचालकाने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात घडली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
संभाजी हरिभाऊ गायकवाड (वय ३२, रा. सणसवाडी ता. शिरुर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेले कारचालकाचे नाव आहे. तर महेंद्रसिंग मंगलसिंग राजपूत (रा. पाबळ चौक शिक्रापूर ता. शिरुर) आणि जयश्री संजय दौंडकर (रा. ग्रीनवूड सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिल भाऊसाहेब औटी (वय ४४ रा. चाऱ्होली, ता. हवेली जि. पुणे) यांनी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल औटी हे पुणे नगर महामार्गावर नगरकडून पुण्याच्या दिशेने त्यांच्या कारमधून चालले होते. त्यांची कार शिक्रापूर येथील पाबळ चौकात आली असता, मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत असलेले संभाजी गायकवाड यांच्या कारने औटी यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. तसेच गायकवाड यांनी समोरील दोन दुचाकींना धडक दिली.
दरम्यान, या अपघातात दुचाकीवरील महेंद्रसिंग राजपूत व जयश्री दौंडकर हे दोघे जखमी झाले. तर दोन दुचाकी व एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, शिक्रापूर पोलिसांनी चाकण चौक येथे नाकाबंदी करून मद्यधुंद कार चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राजेश माने करीत आहेत.
ही कामगिरी शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सहदेव ठुबे, गणेश शेंडे, बापू हदागळे, पोलीस नाईक मिलिंद देवरे, ज्ञानदेव गोरे, ट्राफिक वार्डन अमोल राऊत आणि अनिल वाडेकर यांच्या पथकाने केली आहे.