बारामती : बारामती नगरपरिषदेत आरोग्य विषयक कामे घेणाऱ्या ठेकेदाराकडील एका कर्मचाऱ्याने महिला कामगारांविषयी अश्लिल संभाषण करत या महिलेची मागणी करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे बारामतीत एकच खळबळ उडाली असून उपलब्ध ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरु आहे. गोरगरीब व असहाय्य महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या या नराधमांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पालिकेच्या आरोग्य विभागाचे कंत्राट असलेल्या कंपनीच्या पर्यवेक्षक व कामगारांमध्ये यासंबंधीचा संवाद झाला आहे. स्वच्छता काम करणाऱ्या काही महिलांपैकी कोण सुंदर दिसते, अमक्या महिलेवर डोळा असून कोणत्याही परिस्थितीत ती हवी आहे, अशी मागणी केल्याचे त्यात आढळून आले आहे.
दरम्यान, यानिमित्ताने ठेकेदार कंपन्या व त्यांच्याकडे काम करणारे पर्यवेक्षक, कामगार येथील असहाय्य, परिस्थितीने गांजलेल्या महिलांचा कसा फायदा घेतात, हे समोर आले आहे. पालिकेसंबंधी घडलेला प्रकार पहिल्यादाच नसून असे अनेक प्रकार यापुर्वी देखील समोर आले आहेत. या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याने ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलांची नावेही या क्लिपमध्ये घेण्यात आली आहेत.
यासंबंधी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेत संबंधितांवर कारवाईची करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढण्यात आली असून, व्हायरल ऑडिओ क्लिपमधील दोघांनाही कामावर येवू नये, असे सक्त आदेश देण्यात आले असून यात पालिकेचा यात संबंध नाही. ठेकेदाराकडून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.