पुणे : जागा खरेदी विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाला १० लाख कर्ज देऊन त्यांची मर्सिडीज कार गहाण ठेवून व्याजाची रक्कम काढून घेत आणखी ३३ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या पिसोळीचा माजी सरपंचासह दोघांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिक उमेश श्रीहरी मांगडे (वय-३७ रा. श्रेया कॉम्पलेक्स, मांगडेवाडी, कात्रज) आणि पिसोळीचा माजी सरपंच व पाणी व्यावसायिक नवनाथ ज्ञानोबा मासाळ (वय-४० रा. माऊली निवास, पिसोळी, ता. हवेली) यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जागा खरेदी विक्री करणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांना व्यावसायासाठी जानेवारी २०२० मध्ये १० लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यांनी नवनाथ मासाळ याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी मासाळ याने त्याच्या ओळखीचा सावकार उमेश मांगडे याच्याकडे घेऊन जाऊन नवनाथ मासाळ याने उमेश मांगडे याच्याकडून १० लाख रुपये ५ टक्के प्रतिमहीना व्याजाने घेऊन फिर्यादी यांना दिले.
पैशांच्या मोबदल्यात आरोपी नवनाथ मासाळ याने फिर्यादी यांची मर्सिडीज बेंझ गाडी उमेश मांगडे यांच्याकडे गहाण ठेवली. मांगडे याने व्याजाचे काही हप्ते घेऊन ९ लाख ५० हजार रुपये फिर्यादी यांना दिले. दरम्यान फिर्यादी यांनी ४ लाख १० हजार रुपये व्याज परत केले नाही. त्यामुळे आरोपींनी संगनमत करुन व्याजावर व्याज आकारणी करुन फिर्यादी यांच्याकडून १ शॉप व १ फ्लॅट तारण म्हणून घेतला. शॉप आणि फ्लॅट सोडवण्यासाठी आरोपींनी ३३ लाख रुपये खंडणी मागणी करुन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले. खंडणी विरोधी पथक -2 कडून फिर्यादी यांच्या अर्जाची चौकशी करुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.