हवेली : गाडी हळू चालवा असे सांगितल्याने सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) येथे हातात तलवार व कोयते घेऊन दहशत निर्माण करत महिलेला मारहाण करून फरार झालेल्या कोयता गॅंगच्या पाच सराईतांना हवेली पोलीसांनी अटक केली आहे.
सुरज जालिंदर ठाकुर (वय २१), निलेश श्रीराम साह (वय- २३), अक्षय सुरेश चव्हाण (वय – २३), सागर कांतु पाटील (वय-२२), निकुन ऊर्फ अनिकेत विनायक मोरे, (वय – २२), रा. सर्व गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गॅंगमधील आणखी सहा आरोपी फरार असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १५) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे अरुंद अंतर्गत रस्त्यावर लहान मुले खेळत असल्याने एका महिलेने आरोपींना गाडी हळू चालवा असे सांगितले.
त्यावरुन बाचाबाची झाली व आरोपींनी हातात तलवार व कोयते घेऊन येत भर रस्त्यावर दहशत निर्माण करत महिलांनाही मारहाण केली. तसेच रहिवाशांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले होते. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली होती. अकरा पैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अटक केलेल्या टोळीतील सदस्यांवर यापुर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, खंडणी मागणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्हयात वापरलेले हत्यार एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आलेला आहे. यापुढे सुध्दा अशाप्रकारे दहशत माजविणारे गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची महिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग भाऊसाहेब ढोले पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, नितीन नाम, पोलीस उपनिरीक्षक आंबेकर, पोलीस हवालदार पाटसकर, निलेश राणे, दिपक गायकवाड, राजेंद्र मुंडे, रजनीकांत खंडाळे व मकसूद सय्यद यांचे पथकाने केली आहे.