पुणे : मालमत्तेच्या वारस नोंदीसाठी हवेली सिटी सर्व्हे कार्यालया अंतर्गत येत असलेल्या खडकमाळ कार्यालयातील कंत्राटी महिला कर्मचा-याने ६ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.२१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी लावरे असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मालमत्तेची (घर व जागा) वारसनोंद करण्यासाठी हवेली सिटी सव्हें कार्यालया अंतर्गत खडकमाळ कार्यालयातील परिरक्षण भुमापक यांना भेटुन कागदपत्रांची पुर्तता केली होती. त्यानंतर त्या कार्यालयातील कंत्राटी काम करणा-या महिला कर्मचारी लक्ष्मी लावरे यांनी ती नोंद करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी व परिरक्षण भुमापक यांच्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी एका ३१ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या मालमतेच्या वारस नोंदीसाठी लक्ष्मी लावरे यांनी तडजोडीअंती त्यांच्या स्वतःसाठी व परिरक्षण भुमापक यांच्यासाठी ६ हजार रुपयांची मागणी केल्याचे आढळून आले. व लाचेची मागणी केली म्हणून लक्ष्मी लावरे यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ यावर संपर्क साधावा. असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.