शिक्रापूर, ( पुणे) : सणसवाडी (शिरूर) हद्दीतील औदयोगिक वसाहत परिसरात दहशत माजविणाऱ्या, तसेच कंपनी व्यवस्थापक व व्यवसायिक यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या गुन्हेगाराला शिक्रापुर पोलिसांनी अटक केली आहे. तर संस्थेचा संस्थापक अध्यक्ष याचा शोध सुरू आहे.
निलेश महादेव दरेकर (वय-३२, रा. सणसवाडी ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अफसर शेख असे अध्यक्ष असलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत यझाता इस्टेट प्रोजेक्ट कंपनीचे मालक ईराज फरीदाणी यांनी व ॲक्टिव्ह क्रोमवेल एक्झॉस्ट कंपनीचे एच. आर मॅनेजर फिर्यादी प्रविण बडदे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश दरेकर हा मानव विकास परिषद या संघटनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे. सणसवाडी औदयोगिक वसाहतीमधील कंपनी व्यवस्थापक व व्यवसायिक यांना राष्ट्रीय नेते अफसर शेख हे आहेत.
आमच्याकडे तुमच्या कंपन्याविरुद्ध भरपुर तक्रारी अर्ज आहेत. तरी तुम्ही मला तुमच्या कंपन्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट दया, नाहीतर मला दरमहा पैसे दया, नाहीतर मी तुम्हाला जिवे मारीन किंवा तुमचे स्टाफचे हात पाय मोडीन, पीएमआरडीए, ग्रामपंचायत, एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळ, फायर डिपार्टमेंट यांचेकडे आमचे संस्थेमार्फत तक्रारी अर्ज करून त्रास देईल अशा प्रकारे दमदाटी करून कंपनी विरुद्धात पीएमआरडी कार्यालयासमोर आंदोलन करणार अशी धमकी देऊन खंडणी मागितली होती.
ॲक्टिव्ह क्रोमवेल एक्झॉस्ट कंपनीचे एच. आर मॅनेजर प्रविण बडदे यांनी निलेश महादेव दरेकर याच्या विरोधात मंगळवारी (ता. १४) गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. संस्थेचा संस्थापक अध्यक्ष याचा शोध सुरू आहे.
तसेच वरील प्रमाणेच यझाता इस्टेट प्रोजेक्ट कंपनीचे मालक ईराज फरीदाणी यांना देखील निलेश दरेकर याने लोकन्याय संघर्ष पेपरला बातमी दिली आहे. जरी माझे कोटेशनची किंमत जास्त असली तरी तुम्ही मलाच कॅन्ट्रॅक्ट दया नाहीतर मी तुम्हाला जीवे मारीन अशी दमदाटी करून महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची धमकी दिली होती. याबाबत निलेश दरेकर व अफसर शेख यांच्याविरुद्ध खंडणी मागितले बाबत खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, वरील दोन्ही गुन्हयांचे तपास मा. पोलीस अधिक्षक अंकीत गोयल साहेब, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर शिक्रापुर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस नाईक अतुल पखाले हे करीत आहेत.
औदयोगिक वसाहती कंपन्यामधील वेगवेगळया कंत्राटदारांना व कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांना धमकावून कोणी खंडणी मागत असेल तर कंपनी अधिकारी / कंत्राटदार यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे फोन नंबर ०२१३७२८६३३३ व ९०७७१००१०० यावर फोन करून अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा व तक्रार दयावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
औदयोगिक वसाहतीमधील कंपन्यातील माथाडी कामगार ठेकेदार, स्क्रॅप ठेकेदार, पाणी पुरवठा ठेकेदार, ट्रान्सपोर्ट ठेकेदार, लेबर ठेकेदार, हाऊस किपींग ठकेदार, कॅन्टींग ठेकेदार, सिक्युरीटी ठेकेदार यांना तसेच कंपनी एचआर मॅनेजर / अधिकारी यांना धमकावुन कोणी खंडणी मागत असेल तर तक्रारदार यांनी कोणालाही न घाबरता तक्रार दयावी.
तक्रारदार यांना संरक्षण देऊन गुन्हेगार यांच्यावर आवश्यकतेनुसार मोक्का तसेच एमपीआयडी कायदयान्वये कारवाई केली जाईल असे आवाहन पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल व अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांनी केले आहे.