शिर्डी : साईबाबांसंबंधी आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित केल्याकरणी हैद्राबाद येथील तिघांविरूद्ध शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरधर स्वामी, हिरालाल श्रीनिवास काबरा यांच्यासह अन्य एकाच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीतील साईभक्त शिवाजी अमृतराव गोंदकर यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियात ३१ जानेवारीला यूट्युबवर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये साईबाबांविषयी बदनामीकारक व खोटे वक्तव्य करण्यात आलेले आहे. त्यातील माहितीनुसार गिरधर स्वामी, हिरालाल श्रीनिवास काबरा (रा. हैदराबाद) यांनी हे वक्तव्य केल्याचे आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचे आढळून आले. यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, गिरधर स्वामी यांनी हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. हैद्राबादमध्ये जाऊन तसेच तांत्रिक मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.