दौंड : पाटस दौंड रस्त्यावर बिरबवाडी येथे झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सकाळी ०९.१५ च्या सुमारास आयुषकुमार राजेश यादव हा विद्यार्थी बिरोबावाडी येथे शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना एम. एच. ४२ बी. एफ. ३७५५ या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या घटनेनंतर चालक पळून गेला असून या अपघातात आयुषकुमार राजेश यादव (वय ८ वर्ष, रा.पासलकर डेअरी बिरोबावाडी, मुळ रा. पाली, ता.बेनिपट्टी, जि. मधुबन्नी, बिहार) याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर सुमारे तीन ते चार तास ग्रामस्थांनी पाटस दौंड हा रस्ता रोखून धरला होता. यावेळी माजी आमदार रमेश थोरात देखील आंदोलनात सहभागी होऊन, बिरोबावाडी येथे तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. बांधकाम विभाग व प्रशासनाचे मार्फत या ठिकाणी लवकरच गतिरोधक बसवले जातील असे आश्वासन मिळाल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.
याबाबत राम कैलास यादव यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पिकअप चालकाविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संपांगे हे करीत आहेत.