पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट’ (एनआयबीएम) संस्थेतील सुरक्षा पर्यवेक्षकाच्या गळ्यावर तलवार ठेवून चोरट्यांनी संस्थेच्या आवारातील चंदनाची झाडे, कपडे, दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचे डेबिट कार्ड असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भूपेंदरसिंग दारासिंग (वय ४१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (१२ ऑक्टोबर) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोंढवा परिसरामध्ये एनआयबीएम ही नामांकित संस्था आहे. फिर्यादी भूपेंदरसिंग या संस्थेमध्ये सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून काम करतात. बुधवारी मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास भूपेंदरसिंग व त्यांचे सहकारी सुरक्षारक्षक शिवलाल पासवान पाहणी करीत होते. भूपेंदरसिंग संस्थेच्या सभागृह व फिल्टर पॉइंट येथे काम करीत होते.
त्या वेळी संस्थेच्या आवारात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरडाओरडा न करण्यास बजावले. त्यानंतर चोरट्यांनी संस्थेतील तीन चंदनाची झाडे तोडून सहा हजार रुपये किमतीचे तीन चंदनाचे ओंडके, शिवलाल पासवान यांच्या बॅगमधील दोन शर्ट, डेबिट कार्ड असा ऐवज चोरी करून नेला. फिर्यादीने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता गिलोरीने दगड मारून त्यांना जखमी केले. पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.