कोल्हापूर : विशाळगड पायथ्याला झालेल्या हिंसक घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांनी ५०० हून अधिक शिवभक्तांची धरपकड करत गुन्हे दाखल केले आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीराजेंवर अटकेची टांगती तलवार आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून झालेल्या या कारवाईविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर राहणार आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. संभाजीराजे म्हणाले की, काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे.
काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले असून प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच मी स्वतः शाहूवाडी पोलिस ठाण्यात हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना केले आहे.
काल शिवभक्तांचा आक्रोश पाहून विशाळगडावर अतिक्रमण काढू असे तुम्ही सांगितले होते. आतापर्यंत का अतिक्रमण काढले नाही. न्यायालयीन बाब आहे असे सांगितले होते, लगेच परवानगी कशी दिली? हा माझा त्यांना सवाल आहे. संसद भवनमध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा पायंडा मी पाडला आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.