अजित जगताप
सातारा : तीन कोटींचे कर्ज असलेल्या जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत वाईतील एका उद्योजकाला सहभागी करून त्याची ११ कोटी ३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील साहेबराव देशमुख बँकेच्या चेअरमनसह १९ जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
साहेबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बँकेचे तत्कालीन चेअरमन सुभाष देशमुख, विद्यमान चेअरमन बिपीन कुरतडकर, वसुली अधिकारी खामकर, जनरल मॅनेजर अनिल कदम, साकीनाका शाखेचे मॅनेजर हणमंत बोडके, विठ्ठल चिकणे, अरविद धनकडे, साधना जाधव, सुनीता जुनघरे, बिना मेहता, विशाल शहा, विजय शिंदे, राजेश्वर कासार अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर, संजय चंद्रकांत मोरे (वय 63, रा. मोतीबाग, वाई, जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मोरे यांची संभाजीनगर येथे मोरे स्पोर्ट्स इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. तसेच वाई येथेही साई पर्न शिट नावाची कंपनी आहे. विजय शिंदे यांच्या मालकीची खिंडकाडी (सातारा) येथे १०.५ एकर एनए जागा आहे.
यावर साहेबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बँकेचे ३ कोटींचे कर्ज होते. हे कर्ज थकीत असल्याने बँकेचे अधिकारी उद्योजक संजय मोरे यांच्याकडे संभाजीनगर येथे गेले. त्यांनी ही जागा विकत घेण्यासाठी लिलाव प्रक्रियेत मोरेंना सहभागी होण्यास सांगितले. त्यानुसार ते सहभागी झाले.
संजय मोरे यांनी विविध बँकांचे कर्ज काढून लिलावाचे ८ कोटी ३ लाख ६२ हजार रुपये भरले. तसेच इतर व्यवहारासाठी संभाजीनगर येथील तापडिया टेरेस अदालत रोड येथील मोरे यांचे मित्र दिनेश दरक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या पाच दुकान गाळय़ांवर प्रत्येकी ४० लाखांचे कर्ज काढून २ कोटी रुपये उभे केले. नोंदणीसाठी १ कोटी रुपयांचा खर्च आला. असे एकूण ११ कोटी या व्यवहारापोटी त्यांनी खर्च केले.
मूळ मालक विजय शिंदे याने त्या जमिनीवर ७५ प्लॉट केले होते. त्यापैकी 6 प्लॉट विकण्याची परवानगी बँकेने परस्पर दिली. सहा प्लॉटपैकी पाच प्लॉट मालक नसलेल्या कंपनीने इतरांना विकले. यामध्ये साहेबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
या सर्वानी मे. क्रिस्टल बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स अशी कंपनी स्थापन केली होती. प्लॉटच्या विक्रीनंतर या कंपनीची सातबारावरील नोंद तलाठय़ांना अर्ज देऊन रद्द केली आहे.
हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मूळ शेती मालक विजय शिंदे आणि बँकेने आपली फसवणूक केल्याचे फिर्यादी मोरे यांच्या निदर्शनास आले. यानंतर संजय मोरे यांनी आपली ११ कोटींची फसकणूक झाल्याची फिर्याद त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.
त्यानुसार साहेबराव देशमुख बँकेच्या चेअरमनसह १९ जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक केली नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.