पौड : कासार आंबोली (ता.मुळशी) येथे वीटभट्टी कामगाराने बायकोच्या डोक्यात टिकाव घालून खून केला होता. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले आहेत.
विनोद कुमार केहरिसिंग बंजारा (वय :३५, रा. सध्या कासार अंबोली ता. मुळशी, मुळ गाव उत्तरप्रदेश) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुनितादेवी विनोद कुमार केहरिसिंग बंजारा असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रमेश बंडू कांबळे (वय ६०, व्यवसाय शेती व विट भट्टी, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश कांबळे हे एक विट भट्टी व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे विनोद कुमार आणि त्याची पत्नी सुनितादेवी हे काम करत होते. १९ फेब्रुवारी २०१७ ला विनोद कुमार व सुनितादेवी यांची भांडणे जुंपली. या भांडणात आरोपी विनोद कुमारने सुनितादेवीच्या डोक्यात टिकाव मारून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खुन केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी रमेश कांबळे यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील शिवाजीनगर सेशन न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षाच्या वतीने वकील चंद्रकिरण साळवी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विनोद कुमार याला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांना पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. डी. शिंदे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक एन. एस. मोरे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचित, सहाय्यक फौजदार बी.बी. कदम यांची मदत मिळाली आहे.