पुणे : कारवाई न करता दुचाकी गाडी परत देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या चाकण वाहतूक पोलीस शाखेतील एका कर्मचाऱ्याला व त्यांच्यासाठी झिरो म्हणुन काम करणारा मदतनिस अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ०६) ताब्यात घेतले आहे.
पोलीस कर्मचारी आप्पासाहेब अंबादास जायभाय (वय -३२) व खासगी मदतनीस किशोर भगवान चौगुले (वय-४३) ही त्यांची नावे असुन परीसरातील एका २२ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, चाकण वाहतूक विभागाने कारवाईसाठी तक्रारदार यांची दुचाकी ताब्यात घेतली होती. कारवाई न करता दुचाकी देण्यासाठी जायभाय याने १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती ७ हजार देण्याचे ठरले. संबंधित तरुणाकडून ७ हजार रुपयांची लाच घेताना आप्पासाहेब जायभाय व किशोर चौगुले लाचेची रक्कम स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरील दोघांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शितल घोगरे व सहकाऱ्यांनी केली आहे.