गोंदिया : राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच विनयभंगाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सरकारकडून कडक कारवाईसाठी पाऊले उचलली जात आहे. त्यात कोलकाता आणि बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना आता गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात, ‘तू माझ्याशी बोलत जा, मला भेटत जा, हा घे मोबाईल’ अशी धमकी देत एका रोमिओने 13 वर्षीय मुलीवर बळजबरी केली असल्याची घटना समोर येत आहे. मात्र, ती विद्यार्थिनी त्याच्या जाळ्यात अडकली नाही. त्यामुळे आरोपीने तिचा दोनदा विनयभंग केला.
खुशाल कैलाश राऊत (वय 18, रा. परसटोला) असे मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी येथे 13 वर्षाची मुलगी गुरुवारी (दि. 22) खासगी वसतिगृहातून सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेला निघाली होती. यावेळी शिवाजी चौकात खुशाल राऊत हा रोमिओ तिचा पाठलाग करत आला. त्याने त्या मुलीचा हात पकडत तिला मोबाईल दिला. मात्र, तिने तो घेण्यास नकार दिला. त्यावेळी त्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ती मुलगी शाळेत निघून केली.
त्या मुलीने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत निघाली असता त्या मुलाने तिचा पाठलाग केला आणि म्हणाला, तू माझ्याशी बोल, माझ्याशी संबंध ठेव. अन्यथा तुला मारून टाकीन, असे म्हणत शाळेसमोरच त्या मुलीचा हात पकडला. मुलाचे हे कृत्य पाहून मुलीचा संताप अनावर झाला. त्यावेळी तिने परिसरातच आरडाओरड केला. त्यानंतर खुशालने तेथून पळ काढला.
दरम्यान, मुलीने हा सर्व प्रकार वसतिगृहात आल्यावर अधीक्षकांना सांगितला. विद्यार्थिनीने महिला अधीक्षकांच्या सोबत देवरी पोलिस ठाण्याच जाऊन या मुलाची तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. त्या रोमिओला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याची तुरूंगात रवानगी केली आहे.