खेड : बिबट्याच्या हल्लात एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील भिवेगांव येथे घडली आहे.
लक्ष्मण रामभाऊ वनघरे (वय. ६०) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, भिवेगांव येथे ( ता.१९ ) सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान लक्ष्मण वनघरे हे आपली जनावरे गोठ्यामध्ये बांधण्यासाठी गेले. यावेळी घरी परताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात लक्ष्मण वनघरे यांचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याने त्यांच्या गळ्याच्या, शरीराचा पुढचा भाग तसेच शरीराचा काही भाग खाल्ला असून त्यांना अनेक मोठ्या जखमाही झाल्या आहेत.
दरम्यान, जनावरे बांधण्यासाठी गेलेली लक्ष्मण वनघरे घरी न परतल्याने त्यांची आसपास शोधाशोध घेत असताना गोठ्याच्या जवळच असलेल्या बिबट्याने शोध घेणाऱ्यावर देखील चाल करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलात पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे टोकावडे वनविभागाचे वन परिमंडल अधिकारी चेतन नलावडे, वनरक्षक ए.आर. गुट्टे, संदिप अरूण यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन लक्ष्मण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर- चांडोली ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. बिबट्याचा शोध वन विभागाच्या वतीने सुरू आहे.