पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २०) हि घटना घडली आहे.
त्रिभुवन विठ्ठल कावले (वय ३०, रा. गांजवे चौक, मूळ रा. जालना) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिट्ठी (सुसाईड नोट) देखील आढळून आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिभुवन कावले हा दीड वर्षापासून पुण्यातील गांजवे चौक परिसरात खोलीवर राहात होता. याच परिसरातील एका अभ्यासिकेमध्ये तो अभ्यास करीत होता. मंगळवारी त्रिभुवन हा नेहमीप्रमाणे अभ्यासिकेमध्ये गेला नाही. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याचे मित्र तो राहात असलेल्या ठिकाणी गेले, त्यावेळी त्याची खोली आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वारंवार आवाज देऊनही त्रिभुवनने खोली उघडली नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्रिभुवनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली.
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्रिभुवन कावळे हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये आपण नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याने त्याने नमूद केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.