मावळ, (पुणे) : धुलीवंदन खेळून इंद्रायणी नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आहे. मावळ तालुक्यातील वराळे येथे मंगळवारी (ता. ०७) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय २१, रा. तारखेड, पाचोरा जि. जळगाव) नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप पाटील हा तरुण आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षात शिकत होता. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ७ विद्यार्थी धुलीवंदन खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले. हातपाय धुवत असताना जयदीप पाटील याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. त्याचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थापक निलेश गराडे त्यांची टीम दाखल झाली. बोटीच्या साहाय्याने बुडालेल्या विद्यार्थ्याचा दोन तास शोध घेऊन मृतदेह नदीपात्रातुन बाहेर काढला. दरम्यान, घटनास्थळी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित सावंत, पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ चालकोळी, पोलीस अंमलदार युवराज वाघमारे, सचिन कचोळे, शिवाजी बांगर, आदींनी घटनास्थळी भेट दिली.